योजनेचे नाव : जल जीवन मिशन योजनेचे निकष : मा. पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी देशातील प्रत्येक कुटूंबास 2024 पर्यंत “हर घर नल से जल” उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. या साठी, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सन 2024 पर्यंत (2023-24 वर्ष) देशातील सर्व घरांना घरघुती नळ जोडणी देणे (FHTC) Functional House Hold Tap Connection, पाणी पुरवठा करावयाचा आहे.
या करीता केंद्र शासनाने सन 2009-10 पासून सुरू असलेला, केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम जल जीवन मिशनमध्ये समाविष्ट करून, पुर्नरचना करण्याचे ठरविले आहे. या नुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत “हर घर नल से जल” (FHTC) प्रमाणे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे व यास जल जीवन मिशन हे नाव दिले आहे.
या करीता, महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय क्र. जजमि 2019/प्र.क्र.138/पापु-10(07) दिनांक 04 सप्टेंबर 2020 शासन निर्णया नुसार जल जीवन मिशन राबविणे बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
उद्दिष्ट
जल जीवन मिशन अंतर्गत, सन 2024 पर्यंत राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास घरगुती कार्यात्मक नळ जोडणीव्दारे विहित गुणवत्तेचे (शुद्ध, स्वच्छ व शाश्वत) पाणी प्रती माणसी किमान 55 लि. प्रति दिन या प्रमाणात उपलब्ध करून देणे हा जल जीवन मिशनचा मुख्य उद्देश आहे.
प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस, स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध व पुरेसा आणि शाश्वत पाणी पुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत ग्रामस्थाच्या सोयीच्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे.
फक्त योजना पूर्ण करणे एवढाच उद्देश नसून कार्यक्षम पाणी पुरवठयाची एक शाश्वत सेवा उपलब्ध करणे हा त्यामधील प्रमुख गाभा आहे.
20 पेक्षा जास्त कुटुंब असलेल्या वसाहतीस, प्रति व्यक्ती किमान 55 लि. प्रति दिन प्रमाणे पाणी पुरविण्यात येणार आहे.